विश्लेषण

औरंगाबाद महापालिकेत भाजप नगरसेवकांचा हल्लाबोल, उपमहापौरांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन ठरावावरून महापालिकेत शुक्रवारी (ता.13) सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिलेला असताना शिवसेनेने मात्र अभद्र आघाडी करून मुख्यमंत्री बनविला, असा चिमटा भाजप नगरसेवकांनी काढताच आम्हाला संस्कार शिकवू नका, सांगत शिवसेनेने प्रतिहल्ला केला. दरम्यान औरंगाबादची जनता आपल्याला जाब विचारत असल्याचे सांगत उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर औरंगाबादेत शिवसेना भाजपमध्ये वाद सुरू आहे. भाजपने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र आसन व्यवस्था करून शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. यावेळी शिवसेनेचे सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तेव्हाच भाजपचे उपमहापौर विजय औताडे हे नगरसेवकांमध्ये येउन बसले. 

त्यावर शिवसेनेचे सदस्य त्र्यंबक तुपे यांनी सभागृहाचे काही प्रोटोकॉल आहेत. उपमहापौरांनी डायसवरून खाली बसणे योग्य नाही. याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुख्यमंत्र्यांचे आम्हाला देखील अभिनंदन करायचे आहे त्यामुळे घाईगडबडीत हा ठराव आणू नका, अशी मागणी भाजप सदस्यांनी केली , तर तुमचे विचार आम्हाला कळले आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही, अशी टोलेबाजी शिवसेना नगरसेवकांनी केली. 

अर्धा तास शिवसेना-भाजपा नगरसेवकांचा सभागृहात गोंधळ सुरू होता. उपमहापौर राजीनामा देत आहेत, युतीत सभापती झालेल्या जयश्री कुलकर्णीही राजीनामा देणार का असा प्रश्न शिवसेनेने केला. त्यामुळे गोंधळात भर पडली. शेवटी महापौरांनी या गदारोळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. 

मला पदावर राहण्याचा अधिकार नाही - औताडे 
औरंगाबादेत युतीची सत्ता आहे. विधानसभेला देखील जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला मात्र शिवसेनेने अभद्र आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळविले. त्यामुळे आता जनता मला जाब विचारत आहे. या पदावर राहण्याचा मला अधिकार नाही, असे सांगत उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त अस्तिक कुमार पंडे यांच्याकडे सुपूर्द केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT